अक्षत गणपती मंदिर
जुना कापड बाजार, कल्याण
संकलन – सुधीर लिमये पेण
कल्याण मधील अक्षत गणपती मंदिर हे जुना कापड बाजार येथे आहे. हा सर्व रस्ता परिसर बाजारपेठ म्हणूनच ओळखला जातो. हे मंदिर पेशवेकालीन असून जवळजवळ ३०० वर्षे जुने आहे. मंदिर गलबतावर काम करणारे सरदार लेले यांनी बांधले.
थोरले बाजीराव पेशवे यांचा विवाह कल्याणमध्ये झाला. पार नाक्यावर छत्रपती शिक्षण मंडळाचे अभिनव विद्यामंदिर आहे, त्या पूर्वी तिथे जो वाडा होता त्या वाडय़ात हा लग्नसोहळा झाला. प्रथेप्रमाणे लग्नकार्याची पहिली अक्षता गणपतीस द्यायची होती. पण या परिसरात जवळपास कोठेही गणपतीचे मंदिर नव्हते. लग्नाची अक्षत कोठे ठेवावी हा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळी या गणपतीची स्थापना झाली व बाजीराव पेशवे यांच्या लग्नाची अक्षत गणपतीपुढे ठेवण्यात आली. तेव्हापासून या गणपतीला अक्षत गणपती असे नाव पडले. तेव्हापासून या गणपतीला मंगल कार्याची अक्षत ठेवली जाते. हा कल्याणमधील प्रथम मानाचा गणपती आहे.
गणेशमूर्ती ज्या ठिकाणी विराजमान आहे, तो १० फूट लांब व १२ फूट रुंदीचा गाभारा आहे. सभामंडप १००० चौ.फुट आहे. चौथऱ्याच्या मध्यभागी गणेशाची मूर्ती आहे. चौथरा सहा फूट लांब व साडेचार फूट रुंद तसेच तीन फूट उंच आहे. चौथऱ्याच्या मध्यभागी श्री गणेशाची अडीच फूट उंच डाव्या सोंडेची चतुर्भूज अशी डाव्या भुजेतील श्रीफळाला सोंडेने स्पर्श केलेली, मागील भुजा खांद्यावर टेकवलेल्या स्थितीत, डाव्या पायाची मांडी घातलेली व उजवा पाय उभा ठेवून त्यावर उजवी भुजा, आशीर्वादाच्या पवित्र्यात असलेली पश्चिमाभिमुख मोहक नेत्रांची मूर्ती विराजमान झालेली आहे.
सन १९८८ साली मंदिराचा ट्रस्ट रजिस्टर झाला व मंदिराची व्यवस्था विश्वस्त मंडळ पाहू लागले. कानिटकर कुटुंबीय मंदिरातील श्रीच्या मूर्तीची नित्य पुजाअर्चा करीत आहेत.
स्त्रोत –
‘कल्याण सुभे’ (लेखक विवेकानंद गोडबोले)
‘कल्याण शहराची ऐतिहासिक पाहाणी’
(लेखक सी. व्ही. भिडे)
दैनिक लोकसत्ता २७ फेब्रुवारी २००५