डुल्या मारुती मंदिर
गणेश पेठ, पुणे.
संकलन – सुधीर लिमये पेण
गणेश पेठेमध्ये लक्ष्मी रस्त्यावर रस्त्याच्या मधोमध एक मारुतीचे मंदिर आहे. या हनुमानाला ग्रामरक्षक मानले जाते. इ.स. १७६१ मध्ये पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला. त्यात अनेक मराठा वीर मृत्युमुखी पडले. या प्रसंगी या मारुतीची मूर्ती दुःखाने थरथर कापत होती व डुलत होती म्हणून या मारुतीचे नाव डुल्या मारुती पडले अशी आख्यायिका आहे.
मराठ्यांचे सरदार नारो अनंत नातू यांनी या मूळ मंदिराचे बांधकाम इ.स. १६८० मध्ये केले. कालांतराने इ.स. १७८० मध्ये रखमाबाई जोहरी यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. मकना नावाच्या सुताराने मारुती मंदिरासमोर बालाजीचे मंदिर बांधले. इ.स. १८३० मध्ये लोकवर्गणीतून या मंदिराचा विस्तार करण्यात आला. इ.स. १९३६ मध्ये झालेल्या दंग्यात बालाजी मंदिराचे नुकसान झाल्यामुळे तेथे विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. इ.स. १९६१-६२ मध्ये रस्तारुंदीत या मंदिराची पाच फूट जागा गेल्यानंतर या मंदिराचा जीर्णोद्धार करून कळस बांधण्यात आला.
संदर्भ:
सफर ऐतिहासिक पुण्याची – संभाजी भोसले
पुणे शहरातील मंदिरे – डॉ. शां. ग. महाजन
आठवणी इतिहासाच्या