
देव वाड्यातील गणपती,
देव आळी,पेण
संकलन – सुधीर लिमये पेण
सुमारे २०० वर्षापूर्वी देव घराण्यातील मुळ पुरुष वेळणेश्वर, जिल्हा रत्नागिरी येथून पेण येथे आले. त्यांनी आजची देव वाड्याची जागा कै.आबा पाडळकर यांचे कडून विकत घेतली व तेथे घर बांधले. देव कुटूंबीय गणेश भक्त असल्यामुळे त्यांनी आपल्या घरातील स्त्रियांच्या पुजेसाठी गणेश मंदिर बांधले व मंदिरात ५ फुटी एका चौथऱ्यावर गणेश मूर्ती स्थापन केली. सदरचे गणेश मंदिराला त्यावेळी अर्ध्या भिंती बांधून त्यावर बांबूच्या गजांची जाळी बसवलेली होती. नंतर
कै. सदाशिव उर्फ बाबूराव देव यांनी मंदिराच्या भिंतीवर लोखंडी गज टाकून देऊळ दुमजली केले होते. त्यानंतर आता सन २००९ साली देवळाचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे.
आता नविन बैठे कौलारू चौपाखी सुमारे १५×१५ चे देऊळ बांधले आहे. गणेशाची मूर्ती सुमारे अडीच फुटांची असून डाव्या सोंडेची आहे. मूर्ती तैल रंगाने रंगवलेली आहे. मूर्तीच्या बेंबीत हिरा बसवला आहे. मुर्तीच्या उजव्या बाजूला शंकराची पिंडी, नंदी व डाव्या बाजूला लहान गणपतीची मूर्ती आहे.
या देवळात माघी गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. सध्या सदाशिव उर्फ बाबूराव देव यांचे नातू चंद्रशेखर भास्कर देव कुटूंबीय या देवळाचे व्यवस्थापन पहात आहेत.