पूर्वाभिमुख विष्णू मंदिर वाई, सातारा

 

पूर्वाभिमुख विष्णू मंदिर
वाई, सातारा

संकलन – सुधीर लिमये पेण

हे मंदिर वाईच्या ऐतिहासिक वास्तूकलेतील उत्तम नमुना आहे. संपूर्ण मंदिर मोठ्या घडीव दगडात असून ११ सुरेख कमानीचा सभामंडप आहे. हे मंदिर आनंदराव रास्ते यांनी वर्ष १७६७ मध्ये बांधले. यातील श्री विष्णू व श्रीलक्ष्मीची सुन्दर मूर्ती आहे. मंदिरासमोर असलेला गरुड आकर्षक आहे. त्याचे पायामधे सर्पही दिसतो. मंदिराचे खांब चौरस व रुंद आहेत.

गणपती मंदिरासमोरील सभामंडपाला आहे तसे याचे छत दगडी होते. साधारण ५० चे दशकात एका दुपारी ते कोसळले प्रचंड आवाज झाला पण प्राणहानी झाली नाही. गणपती मंदिर १७६२ मध्ये बांधले.

विष्णू मंदिरासमोरच उजवे बाजूस पश्चिमाभिमुख असलेले लक्ष्मी मंदिरही मंदिर घडीव पाषाणात बांधले आहे. हे मंदिर आनंदराव रास्ते यांनी १७७८ मध्ये बांधले. कलशाचे आकाराचे याचे शिखर ५० फूट उंच आहे तर मंदिराभोवती तटबंदी आहे. याचे खांब घोटीव व कोरलेले आहेत. मंदिराचे सभामंडपाला पाच स्तंभ असून निमुळत्या असलेल्या छतामुळे गुहेसारखा आकार आलेला आहे. मराठा स्थापत्य शैलीतील मंदिराच्या मुख्य शिखराला साठ उपशिखरे आहेत. या शिखरांवर नक्षीकाम दिसून येते. उपशिखरांच्या चारही बाजूंना छत्र्या कोरलेल्या आहेत. तसेच भौमितिक आकृत्यांचा वैविध्यपूर्ण वापर केलेला दिसून येतो. लक्ष्मी यंत्रासारखी शिखराची रचनाकरण्यात आली आहे. गाभा-यामध्ये लक्ष्मीची ढाल, तलवार आदी आयुधे धारण केलेली काळ्या पाषाणातील मूर्ती आहे.

देवीची सोनेरी पैठणी, नक्षीदार सोन्याचा मुकुट आणि प्रभावळ पेशव्यांच्या काळातील कलात्मकतेच दर्शन घडविते. देवीची पूजा उत्सव, सणवार नियमितपणे पार पाडले जातात. सभामंडपामध्ये कीर्तन, भजन होते. त्यादृष्टीने या सभामंडपाची रचना करण्यात आली आहे. येथे आवाज घुमत असल्यामुळे ध्वनीक्षेपकाशिवाय शेवटच्या श्रोत्यापर्यत आवाज पोहचू शकतो.

माधव विद्वांस