मान्सुनचा अंदाज सांगणारे जगन्नाथ मंदिर
बेटा बुजुर्ग, कानपूर, उत्तर प्रदेश
संकलन – सुधीर लिमये पेण
मे महिना अखेर धरणातील पाण्याच्या पातळीत घट, अनेक ठिकाणी पाणी कपात, खेडोपाडी टॅन्करने पाणीपुरवठा अशा बातम्या वाचायला मिळतात. त्याच बरोबर हवामान खात्याकडून मान्सून केरळमध्ये केव्हा येणार, मान्सूनचे आगमन महाराष्ट्रात केव्हा होणार, सरासरी पेक्षा पाऊस किती पडणार याच्या बातम्या हवामान विभाग सांगायला सुरूवात करते.
संपुर्ण भारताचे अर्थशास्त्र हा पाऊस ठरवत असतो. पाऊस कमी पडणे, अती पडणे यामुळे ही नुकसान होणे ठरलेले असते. पावसाचा अंदाज दाते पंचागातही लिहीलेला असतो. असेच पावसाचा अंदाज सांगणारे मंदिर, उत्तरप्रदेशातील कानपूर जवळ आहे. त्याची माहिती येथे दिली आहे.
हे जगन्नाथ मंदिर, कानपूर, उत्तरप्रदेश पासुन ५० किमी अंतरावर तर भीतरगांव विकास खंडा पासुन तीन किमी असलेल्या बेहटा बुजुर्ग गांव येथे आहे.
*मेघोंके जगन्नाथ*म्हणुन ओळखले जाणारे हे मंदिर, पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली आहे. बौध्द शैलीतील ११ व्या शतकातले सम्राट हर्षवर्धनच्या काळातील आहे. समोरील मंडप व गर्भगृहाचे दोन घुमट, रथाच्या आकार असलेल्या या मंदिराच्या भिंती १४ फुट जाडीच्या आहेत. शिखरावर अष्टधातुचे सुदर्शन चक्र आहे.
मंदिरात काळ्या पाषाणातील, जगन्नाथाची मोठी व सुभद्राची मूर्ती लहान आकाराची आहे. सुभद्राची मूर्ती आपल्या उजव्या बाजुला आहे. पाठीमागील बाजुला. दशावतार कोरलेले आहेत. मंदिर परिसरात विष्णूच्या मूर्ती आहेत.
मान्सूनच्या अगोदर दोन आठवडे या मंदिरातील छतावरून पाण्याचे काही थेंब पडतात. या थेंबाच्या आकारा वरून, संख्येवरून पाऊस किती पडणार याचा अंदाज या मंदिरातील पुजारी सांगतात. सात मोठे थेंब पडल्यास पाऊस जास्त पडतो, असा मंदिर पुजारींचा अनुभव आहे.
या वर्षी २७ मे ला छतावरचे दगड पाण्याने हळुहळू ओले व्हायला सुरूवात झाली आहे. आज रोजी छतावरील दगड पुर्णपणे ओले झालेले आहेत पण अजुन पाण्याचे थेंब पडायला सुरूवात झालेली नाही.
या मंदिरा ची रचना व पडणा-या थेंबासंबंधी ब-याच शास्त्रज्ञांनी संशोधन केले, पण अजुनही या रहस्याचा उलगडा झाला नाही.
श्री.पुरुषोत्तम लेले, पुणे, शिल्पकथा ९६८