विठ्ठल रुक्मिणीसह मारुती मंदिर पुणे

मारूती मंदिर
विठ्ठल रुक्मिणीसह मारुती
पुणे

संकलन – सुधीर लिमये पेण

पालखी विठोबा मंदिरावरून सरळ पुढे गेल्यावर आईना मस्जिद लागते. त्या चौकातच डाव्या बाजूला फुटपाथवर एक छोटेखानी देऊळ आहे. देवळाबाहेर द्वारपालांच्या मूर्ती भिंतीवर कोरलेल्या आहेत. मंदिरामध्ये मध्यभागी शेंदुराचर्चीत मारुती आणि त्याच्या उजवीकडे विठ्ठल तर डावीकडे रुक्मिणी यांच्या मूर्ती दिसतात.

शेंदुराची खूप पुटे चढवल्यामुळे मारुतीच्या मुख्य मूर्तीचे नीट दर्शन होत नाही. या मारुतीच्या एका हातात गदा असून दुसरा हात अभय मुद्रेत आहे. शेपटी कमानीसारखी फिरवलेली आहे. हि मूर्ती सुमारे २ फूट उंच आहे. शेजारी असलेल्या विठ्ठल आणि रुक्मिणी यांच्या मूर्ती काळ्या पाषाणात घडविलेल्या आहेत. रुक्मिणी समोर शिवलिंग आणि नंदी अलीकडच्या काळात स्थापन केलेले आहे.

हे मूळ देऊळ मारुतीचे आहे. पण काही कारणास्तव या देवळासमोर असलेल्या चौथऱ्यावरच्या मूर्ती देवळामध्ये स्थापित केल्या गेल्या. या मूर्ती ज्या चौथऱ्यावर होत्या, तो दगडी चौथरा देवळाबाहेर बघायला मिळतो. अशा प्रकारचे आगळेवेगळे मंदिर सापडणे विरळाच. या मंदिराला अशा प्रकारचे स्वरूप अपघातातून प्राप्त झाले असले, तरीही शहराच्या वैशिष्टपूर्ण मंदिरांमध्ये याची गणना होते.

संदर्भ:
वारसा प्रसारक मंडळी
आठवणी इतिहासाच्या