

श्री.गणेश मंदिर
दातार आळी, पेण
संकलन – सुधीर लिमये पेण
दातार आळीतील हे गणेश मंदिर दातार आळीचे प्रवेश व्दारावरच आहे. मंदिरा शेजारी साई दर्शन सोसायटी आहे त्या जागी पूर्वी बेलसरे वाडा होता व त्याचे शेजारी हे पुरातन गणपती मंदिर होते.
पेशव्यांनी त्यांचे सरदार दातार यांचे मंदिरासाठी गणेशाच्या मूर्ती आणलेल्या होत्या त्यातील एक दातार यांचे मंदीरात स्थापन केली व दुसरी या मंदिरात दिली व त्यांनी या मंदिरा शेजारी बेलसरे कुटुंबीय रहात असल्याने त्यांना या मंदिराची पुजा व दिवा बत्ती करण्यास सांगितले होते.
सदरचे मंदिर दुमजली व चौपाखी होते. मंदिरात छोटा गाभारा होता व त्यामध्ये अखंड दगडात कोरलेली गणेशाची मूर्ती होती. गाभाऱ्याच्या पाठीमागील भिंती मध्ये श्रीकृष्णाची मूर्ती होती. गाभाऱ्याच्या पुढे हाॅल होता व त्याच्या पुढील बाजूस व्हरांडा होता व तेथे बसण्यासाठी कट्टे बांधलेले होते. मंदिरात गर्दीच्या वेळी पहिल्या मजल्यावर गॅलरीत बसून कीर्तन/भजन यांचा लाभ घेता येईल अशी व्यवस्था होती. मंदिरातील गाभाऱ्यातून पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी जीना होता. मंदिरास कळस नव्हता. या मंदिराचे पुढेच भव्य असे कासारतळे आहे. पूर्वी या तळ्याचा विस्तार गणपती मंदिराच्या पायरी पर्यत होता. तळ्यात आंघोळ करूच ओलेत्याने पूजा, आवर्तने करीत असत. बेलसरे कुटुंबीय या गणेशाची पुजा व देखभाल करीत. म्हणून या गणपतीला बेलसरे यांचा गणपती म्हणत असत. कालांतराने बेलसरे कुटुंबीय पेण सोडून गेले. त्यानंतर त्यांचे वाड्यात राहणारे जोशी कुटुंबीय गणेशाची पूजा व देखभाल करीत. या मंदिरातच दातार आळीचा गोकुळाष्टमीचा उत्सव गेली सुमारे १३० वर्षे साजरा करण्यात येत आहे. बेलसरे यांनी आपला वाडा विकल्यामुळे त्या जागी साई दर्शन सोसायटी उभी राहिली. गणपती मंदिराची योग्य ती देखभाल होत नसल्याने ते नादुरुस्त होत गेले. त्यामुळे दातार आळीतील रहिवाशांतर्फे सन २००६ साली श्री.गणपती मंदिर व गोपाळकृष्ण संस्था दातार आळी या नावाने ट्रस्ट स्थापन करण्यात आला व मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याचे ठरले व त्याप्रमाणे सन २००८ ला जुने मंदिर पाडून त्या जागी नवीन मंदिराचे बांधकाम सुरू केले. सन २०१२ सध्याचे नविन मंदिर बांधून पूर्ण झाले.
जुने मंदिर पाडल्या नंतर त्या जागी सध्याचे एक मजली नवीन मंदिर बांधण्यात आले आहे. या मंदिरास स्वतंत्र गाभारा नाही. सुमारे ३०×१० चा हाॅल असून एका तीन फुटी चौथऱ्यावर गणेशाची व श्रीकृष्णाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. पूर्वीच्याच गणेश मूर्तीचा वज्रलेप काढण्यात आला आहे.
मंदिरातील श्रीगणेशाची मूर्ती डाव्या सोंडेची असून उजवा पाय दुमडून बसलेली आहे. पुढील उजव्या हातात मोदक व डाव्या हातातील लाडू वर सोंड आहे. मागील हातात परशू व अंकुश आहे. गणेशाची मूर्ती शेंदूरचर्चित आहे.
पूर्वीच्या मंदिराला कळस नव्हता. नवीन मंदिराला कळस बांधण्यात आला आहे. मंदिराचे पहिल्या मजल्यावर हाॅल आहे. मंदिराचे व्यवस्थापन पाहणे साठी बनविण्यात आलेल्या ट्रस्ट तर्फे गोकुळाष्टमी व गणेशोत्सव साजरे करण्यात येतात. या नवीन मंदिराचे बांधकामासाठी पूर्वी दातार आळी मध्ये रहात असलेले श्री राजू पिचीका यांनी बहुमोल सहकार्य केले आहे.