श्री पाटणादेवी मंदिर,
पाटण, चाळीसगाव, जळगाव
संकलन – सुधीर लिमये पेण
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव पासून जवळच असलेल्या गौताळा अभयारण्यात पाटणादेवी या नावाने ओळखले जाणारे आदिशक्ती चंडिकादेवीचे बाराव्या शतकातील पुरातन मंदीर आहे. हे मंदीर सातमाळेच्या सह्याद्री रांगेतील कन्हेरगड किल्ल्याच्या पायथ्याशी व डोंगरी नदीच्या काठी वसलेले आहे. जवळच असलेल्या पाटण या गावाच्या नावामुळे हे ठिकाण पाटणादेवी या नावाने ओळखले जाते.
साधारण दहा ते बारा फूट उंच पीठावर या मंदिराची पूर्वाभिमुख रचना करण्यात आली आहे. मंदिराच्या सभामंडपामध्ये एक पुरातन शिलालेख देखील आपल्या नजरेस पडतो. पाटणादेवीच्या या पुरातन मंदिरात अष्टभुजा देवीची भव्य मूर्ती आहे. देवळासमोर दोन भल्यामोठ्या दगडी दीपमाळा आहेत. मंदिर परिसरात असलेले अनेक भग्नावशेष व प्राचीन शिल्पाकृती पहाण्यासारख्या आहेत.
शून्याचा आविष्कार करणाऱ्या प्रसिद्ध गणिती भास्कराचार्यांनी आपला लीलावती नामक ग्रंथ येथेच बसून लिहिला असा एक शिलालेख देखील भारतीय पुरातत्त्व खात्याला मिळाला आहे. जवळच पितळखोरे लेणी व एक पुरातन शिवमंदिर आहे. भान हरपून टाकणारा गौताळा अभयारण्यचा परिसर व मानवी संस्कृतीचा अप्रतिम कलाविष्कार प्रत्येकाने एकदा तरी अनुभवावा असे हे ठिकाण आहे.