श्री. लक्ष्मी नारायण मंदिर,
नारायण पाखाडी, श्रीवर्धन
संकलन – सुधीर लिमये पेण
श्रीवर्धन हे रायगड जिल्ह्यातील, पेशव्यांचे मुळ गांव, भव्य सागरकिनारा लाभलेले, निसर्गरम्य ठिकाण. मुंबई गोवा महामार्गावर माणगाव गांवापासुन श्रीवर्धनला जाणारा रस्ता आहे. माणगांव श्रीवर्धन अंतर ४७ किमी आहे.
कोकणात अनेक ठिकाणी विष्णू मंदिर आहेत. या मंदिरातील भगवान विष्णूंच्या हातातील क्रम पाहता मूर्ती, केशव, नारायण, माधव, जनार्दनच्या असल्या तरी या मंदिरांना लक्ष्मीनारायण मंदिर म्हटले जाते.
लक्ष्मीनारायण मंदिर, श्रीवर्धन येथील श्रीविष्णूंच्या हातातील आयुधे पद्म, चक्र, गदा, शंख अशा क्रमाने आहेत, म्हणजे ही विष्णू मूर्ती, श्रीधर मूर्ती आहे.
श्रीधर म्हणजे श्रीलक्ष्मीला धारण करणारा असा आहे. या श्रीधर विष्णूच्या अस्तित्वामुळे या गावाची वाढ झाली, नावलौकिक वाढला म्हणून या नांवाचे नांव श्रीवर्धन पडले.
या मंदिरातील लक्ष्मीची मूर्ती भगवान विष्णूंच्या डाव्या मांडीवर आसनस्थ नसुन, माता लक्ष्मी डाव्या पायाजवळ स्वतंत्र पणे उभी आहे. तर उजव्या पायाशी गरूड मूर्ती आहे.
विष्णूंची मूर्ती काळ्या पाषाणातील रेखीव व प्रमाणबध्द असुन नखशिखान्त अशी दागिन्यांनी मढलेली सालंकार मूर्ती २ फुट उंचीची आहे. मागे प्रभावळीवर दशावतार कोरलेले आहेत. पायाच्या घोट्याजवळ नऊ पादवलये असुन तेथेच प्रलंब हार दिसतो, जो यज्ञोपवीता प्रमाणे धारण केलेला आहे. समोरच्या घुमटीत गरूड मूर्ती आहे. या मंदिराच्या शेजारी प्रताप मारूती आहे. समोर मोठी पुष्कर्णी आहे.
हे मंदिर पेशवे स्मारकाजवळ, नारायण पाखाडी येथे आहे. मंदिराचा २९ मार्च १९७५ ला जिर्णोध्दार झाला आहे. मंदिरात पेशवे म्हणायचे तो प्रातःस्मरणीय श्लोक एका भिंतीवर लिहीलेला आहे.
श्री. पुरुषोत्तम लेले, पुणे शिल्पकथा ९८०
माहिती संदर्भ:
१) आपला श्रीवर्धन
२) Shrivardhan diaries
३) पर्यटनाचा आनंद- श्रीनिवास घैसास मनोरमा
प्रकाशन, मुंबई.