
श्री. भृशुंड गणपती मंदिर, मेंढा, भंडारा
संकलन – सुधीर लिमये पेण
प्राचीन स्थंडिलग्राम नावाने प्रसिद्ध असलेल्या मेंढा या गावी वैनगंगा नदीच्या तीरावर विदर्भातील अष्टविनायकांपकी हा गणपती वसलेला आहे. भंडारा या जिल्हय़ाच्या ठिकाणाचे एक उपनगर असलेला हा भाग. या गणपतीला भृशुंडगणपती हे नाव कसे मिळाले याबद्दल एक सुंदर कथा आपल्याला गणेशपुराणात मिळते.
नामा कोळी लोकांना त्रास देत असे. तो या परिसरात वाटमारी करीत असे. एकदा तो गणेशतीर्थ या ठिकाणी अंघोळीला गेला असता मुद्गल ऋषी तिथून चालले होते. ते तोंडाने गजानन गजानन असे नामस्मरण करीत होते. नामा कोळ्याने त्यांना मारण्यासाठी आपली तलवार उपसली आणि तो आता वार करणार एवढय़ात ती तलवार गळून जमिनीवर पडली. नामा कोळ्याला पश्चात्ताप झाला आणि आपली पापे धुण्यासाठी काय करावे याची याचना त्याने मुदगल ऋषींकडे केली. मुदगल ऋषींनी त्याला सांगितले की ते परत येईपर्यंत नामा कोळ्याने श्री गणेशाय नम: असा जप सुरू करावा. तसेच त्यांनी एक वाळकी काठी दिली आणि तिला रोज पाणी घालायला सांगितले. जेव्हा त्या काठीला पालवी फुटेल तेव्हा मी परत येईन, असे आश्वासन मुद्गल ऋषींनी दिले. नामा आता मंत्राचा जप करू लागला. अनेक वष्रे अशीच गेली आणि मुदगल ऋषी तिथे परत आले. त्यांना त्या काठीच्या जागी एक भलामोठा वृक्ष आणि एक मुंग्यांचे वारूळ दृष्टीस पडले. वारुळातून श्री गणेशाय नम: असा आवाज येत होता. ऋषींनी ते वारूळ बाजूला करून पाहिले तर त्यांना नामा कोळी नामस्मरण करताना आढळला. तो गणेशसाधनेत इतका गणेशमय होऊन गेला होता की त्याला नाकाच्या ठिकाणी गणपतीप्रमाणे सोंड फुटली होती. मुदगल ऋषींनी त्याचे तप आणि त्याची सोंड पाहून त्याचे नामकरण भृशुंड ऋषी असे केले. या भृशुंड ऋषींनीच इथे गणपतीच्या मूर्तीची स्थापना केली. मुदगल ऋषींनी त्यांना आशीर्वाद दिला की आणि जो कोणी या ठिकाणी दर्शनाला येईल त्याला सर्व शक्ती प्राप्त होतील असे सांगितले.
मंदिरातील गणेशाची मूर्ती आठ फूट उंचीची मोठी भव्य असून ती सव्यललितासनात बसलेली आहे. पायाशी नागाचे वेटोळे, त्यावर गणेशाचे वाहन उंदीर आणि त्यावर हा गणपती विराजमान झालेला आहे. मूर्ती चतुर्भुज असून एक हात वरद मुद्रेत तर इतर हातात अंकुश, पाश आणि मोदकांनी भरलेले पात्र दिसते. मूर्तीच्या डोक्यावर पाच फण्यांचा नाग शिल्पित केलेला दिसतो. इथेच एक शिवपिंडी असून त्याला जागृतेश्वर असे म्हणतात. मंदिराच्या आवारात एका चौथऱ्यावर अंदाजे आठ फूट उंचीची मारुतीची मूर्ती आहे. शिवाय परिसरात अनेक समाध्या दिसतात.